Saturday, October 20, 2012

नागार्जुन यांच्या तीन कविता (अनुवाद)

 

नागार्जुन यांच्या तीन कविता (अनुवाद)
 
१. मी मिलिट्रीचा म्हातारा घोडा
मी मिलिट्रीचा म्हातारा घोडा
ते माझा लिलाव करतील
मला घेऊन जाईल
एखादा चतुर टांगेवाला
डोळ्यांवर रंगीत झापडे चढवील
आणि म्हणत राहील
पुढे चल बेटा
सरळ चल...
सरळ.....


. हे जे एन यू
नवयुवक नवयुवतींच्या
मनमोकळ्या खेळांचे प्रांगण
हे जे एन यू
मी खरं ते सांगून टाकू का ?
ही अतिशय चांगली जागा आहे
फारच चांगली
अजून काय म्हणू
मी विचार करतोय की मीही प्रवेश घेऊनच टाकतो
'तिबेटीयन' निवडायला कुणी कशाला आक्षेप घेईल
डॉ़क्टर बिमला प्रसाद
डॉक्टर नामवर
डोक्टर मुजीब
मला रेकमेंड करतीलच
मग माझा पुन्हा एकदा उपनयन संस्कार होईल
वसतीगॄहात एक खोली मिळूनच जाईल
शिष्यवृत्तीची देखील व्यवस्था होऊन जाईल
शाब्बास ! बेटा अर्जुन नागा
मी विचार करतच जातोय,
असं काय पडलंय या जागेत
खरंतर ही जागा आहेच मोठी शानदार
जे. एन. यू.,जे. एन. यू.,जे. एन. यू.,


३. त्या दुपारी

तुझी इच्छा असेल चीनला जाण्याची
तर मी व्यवस्था करून देतो!
- मला त्यांनी एकांतात सांगितलं होतं
ही खूप वर्षांपुर्वीची गोष्ट आहे
त्यावेळी मला थोडं रोमांचित झाल्यासारंख वाटलं होतं
नंतर थोडं हसूही आलं होतं
त्यांनी मला खरंच
पाठवून दिलं असतं
चीनच्या सीमेत
त्या नेहरू युगाच्या दुपारी

नागार्जुन

(* या कवितांचा या आधी मराठीत अनुवाद झाला आहे की नाही ते मला ठाऊक नाही. झाला असल्यास हा एक निव्वळ योगायोग समजावा. नागार्जुन यांच्या 'आमि मिलिटरिर बुडो घोडा' या बंगला संग्रहाचा हिंदी अनुवाद शोभाकांत यांनी केलेला आहे.दिल्लीच्या वाणी प्रकाशनाने हा अनुवाद छापला आहे. प्रकाशक आणि अनुवादक दोहोंचे आभार.
नागार्जुन मोठे कवी होते. त्यांच्या कविता वाचणे आणि अनुभवणे ही त्यातल्या त्यात एक विलक्षण प्रक्रिया आहे एवढे या निमित्ताने म्हणावेसे वाटते)

पुर्व-प्रसिध्दी 'ऐसीअक्षरे'

Saturday, August 18, 2012

बरड



नवीन काहीच नाही. दिवस आपल्या गतीने निघून चाललेत. बरेचदा काही विचार येतात, आणि मी थबकतो. मग मी पुन्हा चालू लागतो. हे चालणं अथक आहे, अमर आहे, अजर आहे. चालण्याची प्रक्रिया किती जुनी आहे. चालताना वाटेत कोण कोण भेटून जातं. उंच उंच झाडे. काही पाने पायथ्याशी निश्चल पडलेली. सुबक रस्ते. रस्त्यांच्या दगडी किनार्‍यांवरून चालताना काही प्राचीन भास होतात. मला वाटतं मी अठराव्या शतकातल्या युरपियन देशात चालत आहे. मग मी विचार करतो की दोनशे वर्षांनंतर मी कुठे असेन वगैरे. पुन्हा आजचे शतक. हे भास तसे नवीन नाहीत. औरंगाबादेच्या जुन्या वास्तूंच्या सान्निध्यात मला हे जुनेपण नेहमीच जाणवलेलं. तिथे कुणीकुणी ओळखीचं भेटायचं. आपल्या एकंदरीत जुनेपणाच्या संदर्भात आणखी थोडीशी भर पडायची. वस्तूंच जुनेपण कधीकधी मोठं विलक्षण वाटू लागतं. या वाटा किती जुन्या असतील. इथून कोण कोण गेलं असेल. आपण याच परंपरेतलं एक सूत्र आहोत.
वाटा आणि परंपरा मला नेहमीच खुणावत असतात. एक लहानशी मातेरी वाट. हिरव्यागार गवतातून वर जाणारी. मध्ये एक दोनएकशे वर्षं जुना दगडी पुल. इतक्या वर्षांमध्ये काय काय जोडलं गेलं असेल. जन्म, मृत्यू, प्रेम, मैत्री, द्वेष, हिंसा,उन्माद. आणि प्रदीर्घ चालणं. माझ्या चालण्याशी मी अनेक गोष्टी ताडून बघतो. बदलत जाणार्‍या गावांप्रमाणे आपलं चालणं देखील बदललं आहे काय. की हे चालणं देखील आपल्या कुठंही जोडलं न जाण्यासारखं आहे..
एवढ्या वाटांवरुनी चाललो
लागली पायांस पण माती कुठे...
संदर्भ येतात आणि जातात. गावं बदलतात. कदाचित देशही. मग आपलं गाव कुठलं. पंढरपुरात लोक विचारतात ' तुमचं गाव कुठलं?'. हा प्रश्न मोठा कठीण आहे. माझ्या मनात अनेक प्रश्न उत्पन्न होतात - भौ माझा नेमका गाव नाही. मला माझं म्हणावं असं नाव नाही. मला माझा धर्म माहीत नाही. माझी कुठेही जोडली जाण्याची इच्छा नाही. मी तुला काय सांगू ?
हे रस्ते बरे. अनुवंशहीन. निरीच्छ. उगम नाही - अंतही नाही. कुणी चालावं हा निर्बंधही नाही. (क्रमशः )
अनंत ढवळे
( टीप - प्रुफरीडिंग झालेले नाही...)