Thursday, January 16, 2014

एलेजी

कधी काळ आपला नाही म्हणून
कधी लोक आपले नाहीत म्हणून
कधी रस्ते ओळखीचे नाहीत म्हणून
कधी आधार सापडले नाहीत म्हणून
कधी व्यवस्था आपली नाही म्हणून
कधी आपली व्यवस्था उभारता आली नाही म्हणून
कधी भूमिका फसल्यात म्हणून
कधी बाजू ठरवताच आल्या नाहीत म्हणून
कधी भोगवादाचा चीड आली म्हणून
कधी वस्तूंच्या झगमगाटात हरऊन गेलोत म्हणून
कधी आदर्श सापडले नाहीत म्हणून
कधी वाटा पाडता आल्या नाहीत म्हणून
कधी इतिहास समजला नाही म्हणून
कधी वारसा खोटाय हे समजलं म्हणून
कधी नाकारलो गेलोत म्हणून
कधी तग धरू शकलो नाहीत म्हणून
कधी संतापण्याच्या सर्व शक्यता मावळल्याहेत म्हणून
कधी आरामात जगण्याची सवय झाली आहे म्हणून
मी विचार करतो की आपण सगळे
असे रस्त्याकाठी हतबल उभे आहोत का म्हणून -

अनंत ढवळे
2013

एलिझाबेथ बिशपची एक 'सेस्टीना'

न्याहारीत मिळालेला चमत्कार


सहा वाजता आम्ही कॉफीची वाट पाहात होतो
कॉफी आणि पाव
जे एका विशिष्ट बाल्कनीतून वाटले जाणार होते
एखाद्या जुन्या राजाच्या दानधर्माप्रमाणे किंवा एखादया चमत्काराप्रमाणे.
बाहेर अजून अंधारच होता आणि सुर्याचा एक पाय
नदीच्याएका दीर्घ लाटेवर स्थिराऊन राहिला होता
दिवसाची पहिली नौका कधीच नदी पार करून गेली होती
खूप गारठा होता आणि सूर्य आम्हाला ऊब देईल असे वाटत नव्हते,
आम्ही आशा करत होतो की कॉफी खूप गरम असेल
आणि प्रत्येकाला एक लोणी लावलेला पाव
मिळेल एखाद्या चमत्कारातून;
सात वाजता बाल्कनीतून एक माणूस बाहेर आला
तो बाल्कनीत मिनिटभर एकटाच उभा राहिला
आमच्या डोक्यांच्या पलीकडील नदीकडे पाहात,
एका गड्याने त्याला थाळीमध्ये चमत्कार सोपवला
ज्याच्यात कॉफीचा एकच कप होता
आणि पावाचं एक वेटोळं ज्याचा त्याने एक तुकडा तोडला
त्याचं डोकं खरंतर वर ढगांमध्ये असल्यासाराखं दिसत होतं- सुर्यासोबत
तो माणूस वेडा झाला होता का आणि नक्की काय करत होता या सुर्याखालच्या दुनियेत,
त्याच्या उंच बाल्कनीत उभा राहून ?
प्रत्येक माणसाला एका कपात थेंबभरच कॉफी मिळाली
आणि एकेक जाडाभरडा पावाचा तुकडा
जो काहींनी हेटाळून नदीत फेकून दिला
तरीदेखील आमच्यापैकी काही लोक चमत्कारासाठी रेंगाळत उभे राहिले
मी सांगू शकेन की मी त्यानंतर काय पाहिलं, हा काही चमत्कार नव्हता
मी पावाच्या आडून मिणमिणत्या डोळ्यानी पाहिलं
की एक सुंदर बंगला सुर्याखाली उभा होता
आणि त्या बंगल्याच्या दारातून गरमगरम कॉफीचा सुवास येत होता
समोर नदीवर राहणार्‍या पक्षांनी जोडलेली
एक सुशोभित पांढरी चुनखडी बाल्कनी होती
आणि सज्जे आणि संगमरवरी खोल्या, माझा पाव
आणि माझा बंगला- युगांच्या प्रवाहात माझ्यासाठी बनवले गेलेले, एका चमत्कारातून
पक्षांनी आणि किड्यांनी, आणि नदीने
दगड कोरून. मी दररोज उन्हात
न्याहारीसाठी माझ्या बाल्कनीत पाय वर ठेऊन
भरपूर कॉफी पित आहे
आम्ही पाव चाटला आणि कॉफी गिळून घेतली
नदीपलीकडच्या एका खिडकीने सूर्य पकडला होता
बहुतेक चमत्कार दुसर्‍याच एक बाल्कनीत घडत गेला होता..
एलिझाबेथ बिशप
(१९११-१९७९)
नोंदी
१. हा मुक्त अनुवाद आहे - सेस्टिनाचा फॉर्म जपण्यासाठी काही ठिकाणी तडजोड झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
२. महायुध्दे- अमेरिकतली आर्थिक मंदी -गरिबी- सामाजिक/आर्थिक दरी या परिवेशात ही कविता वाचावी असे सुचवावे वाटते
३. बाल्कनी हा शब्द प्रचलित असल्याने तसाच ठेवला आहे. गॅलरीसाठी समानार्थी म्हणून सज्जा हा शब्द वापरलेला आहे