Saturday, July 30, 2016

बेरंग

--
बेरंग
--
आता हा नवा अधिकारी आल्यापासून सगळ्यांची हालत खराब झाली आहे, तो पैसे खाऊ देत नाही, स्वतः ही खात नाही. सुरुवातीला आपण याच्याशी मैत्री करून पाहिली. आपल्या लायनीत घ्यायचा प्रयत्न केला, पण काही फायदा नाही. तसा वागायला बोलायला बरा आहे. भरपूर शिकलेला आहे. तालेवार घरातला आहे. ह्याचे वडील देखील अधिकारीच होते, थेट कॅबिनेट सेक्रेटरीच. चिक्कार पैसा धरून आहेत. शिवाय दिसतातही नीटनेटके, श्रीमंत. काही लोक दिसतातच पैसेवाले, चकचकीत. हा त्यातलाच आहे. हे असं इतरानाही दिसतं का हे तपासून पहायला पाहिजे. एकदा चंद्याला विचारू. भडवा आपल्यासारखाच आहे. यथातथा परिस्थितीतून आलेला. पण बिनधास्त असतो. मौजमजा करतो. जोक सांगतो सगळ्याना. जिथे जाईल तिथे पॉप्युलर होतो. शिवाय बायाना घुलवण्यात तर एक नंबर आहे. चंद्या वागायला फारच नैसर्गिक आहे. आपल्यासारखा नाही. आपण मनमोकळे बोलत नाही अशी तक्रार सगळ्यांचीच असते. साली सवयच नाही . आपण फक्त पिल्यावर मोकळ ढाकळं बोलू शकतो. हा कदाचित आपला न्यूनगंड असावा.आपल्या डोक्यात काही खेळ सुरू असतो, आणि आपण त्या खेळात गळ्यापर्यंत बुडलेले. मध्येच कुणीतरी काही विचारतो आणि आपल्या खेळात खंड पडतो. मग आपण काहीतरी बोलून वेळ मारून नेतो.चंद्या आपल्याहून खूपच बरा आणि चतुर.आपण आणि चंद्या दोघानी मिळून या नव्या साहेबाला समजावयाचा बराच प्रयत्न केला. आपण जे करतो ते करप्शन नाही, तर कट प्रॅक्टीस आहे. डॉक्टर लोक करतात तशी. आपण फक्त कमीशन घेतो, पण काम चोख होईल याची खातरजमा करतोच. आपल्या नियंत्रणाखाली बनलेल्या सुरगाव रस्त्याचा दाखला दिला. म्हटलो गाडीत बसून चहा पीत जा. बशीतून एक थेंब सांडायचा नाही एवढा मुलायम रस्ता आहे. एक खड्डा नाही त्यावर. गालाशेठ आपला दोस्त कंत्राटदार आहे. पैसा भरवतो इथून तिथून सगळ्याना पण काम साला चोख बजावतो. पण साहेब बधला नाही, म्हटला भ्रष्टाचार देशाला संपवून टाकेल एक दिवस. या विधानावर चंद्या बावळटासारखा फिदी फिदी हसला होता. आपण नंतर झापला त्याला. म्हटलो तू साला चुतिया आहेस. कुणासमोर काय बोलायचं ते कळत नाही तुला. आपलीच गल्ली असल्यासारखा बरळत सुटतो. तर म्हटला झिगझिग करू नकोस जास्ती. तो साहेब बधेना झाला म्हणून तू वैतागला आहेस. त्याच्या बोलण्यात तसं तथ्य होतं. गेले दोनेक महिने झालेत कंत्राटदार घाबरून फिरकतच नाहीत ऑफिसकडे. संध्याकाळी भेटतात, दारू बिरू पाजतात. सोबती कोंबडी, मटण. दारूही स्कॉच. म्हणतात या साहेबाचं करा काही तरी. आपण म्हणतो तो आपल्यापेक्षा वरच्या हुद्द्यावर आहे. शिवाय त्याच्या बापाची सर्वत्र ओळख. भडवा कॅबिनेट सेक्रेटरी होता. त्याने खा खा खाल्लं त्याच्या काळात पण पोराला वाटतं आपला बाप भली इमानदार. आपण काय झाट वाकडं करू शकत नाही त्याचं. आता तो आहे तोवर बसा उगी शांत. पण कंत्राटदाराची जात मोठी चिकट.कामाच्या माणसाला पटवण्यासाठी वाटेल ते करतात. पार्ट्या, बाया न वाट्टेल ते. एवढी सरबराई करतात की डोक्यात हवा जाते. आपण कुणीतरी मोठे आहोत असं वाटायला लागतं. गेल्या वर्षी आपण एक मोठं टेंडर काढल. त्यात गाडी आली. इथल घर झालं. पुढच्या दोनतीन टेंडरात पुण्यात फ्लॅट झाला. अजून आपलं लग्न व्हायचं न त्या आधीच आपली तीन तीन घरं. लोकांचं एकही होत नाही. साला एके काळी आपली ऐपत नव्हती कोल्ड्रिंक प्यायची. न आता हे थाट. हालत बदलत जाते माणसाची. मागच्या लोकांचं पुण्य म्हणा की आणखी काही. पण दिवस बदलत जातात. पण अनेकाना हे समजत नाही आणि मग ते तिथेच अडकून पडतात. आपल्या सदाकाकासारखे. दरवेळी भेटला की लेक्चर देतो. सचोटीने राहा. पैसा खाणे बरे नाही. करप्शन फार दिवस चालत नाही.भले भले डुबले तिथं तुझं काय? तुझा बाप देवमाणूस होता. कधी कुणाचा एक पैसा शिवला नाही त्यानं. आपण सदाकाकाचं मन राखायला ऐकून घेतो. सदाकाका इमानदार माणूस आहे. आयुष्यभर बँकेत प्यून म्हणून राबला पण पोराना व्यवस्थित शिकवलं. आमचीही वेळोवेळी मदत करायचा. आईला याचा आणि काकूचा मोठा आधार वाटायचा. आता काकाची पोरं आपल्याकडून अडल्यानडल्याला पैसे नेतात.त्याला हे माहितच नसतं.आपण सढळ हाताने देतो. कधी विचारीत नाही कशासाठी पण ते सांगतात. मागे लहान्याच्या घराची सुरुवातीची रक्कम कमी पडत होती म्हणून तो आला. आपण चार लाख असे दिले. येतील तेंव्हा दे म्हटलो. पण तोही इमानदार. हातउसण्याची नोटरी घेऊन आला आणि सही करून देऊन गेला, सहा महिन्यात बिनव्याजी देतो म्हणून. आपण हसलो.तो म्हणाला तुझं हसणं कशासाठी आहे - मी पैसे देणार नाही असं वाटतंय म्हणून का? आपण म्हटलो नाही रे. सध्या वरकमाई बंद आहे, तुझ्याकडं वापस मागायची वेळ येते की काय असं वाटलं म्हणून हसलो. पण खरंच का हसलो आपण. साला हा काळ आणि तो काळ असलं काही स्वतःची पाठ थोपटण्याचा काहीतरी प्रकार होता तो. पैशाची खुमखुमी असतेच माणसाला. काही मान्य करतात काही करीत नाहीत.
यावेळी सदाकाका, त्याची पोरे, काकू आणि सगळा भूतकाळ तेंव्हा डोळ्यांपुढून वाहता झाला. माणसं म्हणजे पाऊलखुणा किंवा वर्षांची चिन्हे बनून राहतात. प्रत्येकाची एक खूण, एक चिन्ह. वडील गेल्यानंतरची भकासी आठवली. घरात आपण आणि आई दोघेच. अधून मधून एखादा दूरचा नातेवाईक भेटायला यायचा. एरवी सदाकाका आणि त्याचं कुटुंब हेच आमचे साथीदार. ते शेजारीच राह्यचे. सणासुदील घरी वगैरे बोलवायचे. आपण तेंव्हाही तिथे तटस्थासारखे वावरायचो. क्वचित बोलायचो. पोर्या लैच कमी बोलतो असं काकी म्हणायची. साधू बोवा बनतो क्काय अशी गंमत करायची. पण आपण निव्वळ वडील गेले म्हणून गप्प झालो होतो का. की ती निव्वळ एक घटना होती आपली सत्वपरीक्षा पाहणारी. हा माणूस तुटतो की तुटत नाही हे बघण्यापुरती तात्कालिक आपदा. एरवी मरणारा सुटतो असे घरीदारी सर्रास बोलतात लोक. मागे उरणार्‍यांचीच अवस्था होते. पण ही दुर्गत सगळ्यांचीच होत असावी. एरवीही या समाजात आपण एकटेच नसतो. आपल्या सभोती माणसांचा अफाट गराडा असतो, त्या गराड्यातल्या प्रत्येकाची एक कथा असते. थोड्या बहुत फरकाने बहुतांची पांगाडीच होते. निदान आपल्या दुनियेतल्या माणसांची तरी. ही दुनिया मध्य शहरी लोकांची होती. वीसेक वर्षांपुर्वी लहान खेडेगावांतून लहान शहरांमध्ये आलेले लोक. या शहरांमधून असणार्‍या गावासारख्या भागांमधून एकत्रित राहणारे लोक. शहरात आले तरी आपली भाषा न आपला चेहेरा जपून राहिलेले लोक. त्यामुळे समुहाच्या सुरक्षिततेत असणारी आपलेपणाची भावना तिथे होतीच. पण आपण या सगळ्यामध्ये राहूनही तुटकच होतो, आहोत. आता तर त्या जीवनाचा मागमूसही राहिलेला नाही आणि आपण खूप लांबवर निघून आलो आहोत. पण आई अजूनही तिथेच राहते. आपण अनेकदा मागे लागूनही तीने ते घर सोडलेलं नाही. म्हणाते तुझ्या वडीलांच्या आठवणी आहेत या घरात. आपण एवढा पैसा कमावला पण तीने कधी काही मागितलं नाही. वडलानी मागे सोडलेलं घर आणि पोस्टातले तीन लाख रुपए, एवढी बेगमी तिला आयुष्यभरासात पुरेशी आहे. वडील गेले त्यानंतर त्या पोस्टातल्या पैशावर मिळणारं व्याज हीच आमची एकमेव कमाई होती. तिच्यावर आईने घर चालवलं. आपलं शिक्षण पूर्ण झालं ते इबीस्या लाऊन लाऊन कसंबसं. आधी पदवी मिळवली आणि मग पदव्युत्तर शिक्षण. तोवर यव वाढून गेलं होतं, सोबतचे गडी करते सवरते झाले होते. कमी शिक्षणामुळे त्यांची गत यथातथाच होती पण निदान कमावते झाले होते. त्यातले एखाद दोन अधून मधून भेटायचे, बियर पाजायचे. आपल्याला ही छानछौक शोभत नाही असं वाटूनही आपण नैराश्य घालवण्यासाठी म्हणून थोडीफार घ्यायचोच. आता गंंमत म्हणून दिवसाआड महागडी पितो तेंव्हा जुने दिवस आठवतात. शिक्षण होऊनही सुरुवातीला हातात काहीच नव्हतं. मग आपण एका विना अनुदानित शाळेवर क्लर्कची नौकरी धरली. आठशे रुपए महिना ठरलेला पण दरमहा मिळेलच असा नेम नव्हता. बघता बघता तिथं साताठ महिने गेले. पैकी चारच महिन्यांचा पगार झाला, बाकी डुबले, पण या पैशाचाही केवढा आधार झाला होता.आपण आईसाठी एक साडी घेतली , घरात काही वस्तु घेतल्या.मग एक दिवस सरकारी परिक्षेची जाहिरात पाहिली आणि अर्ज भरला. अक्कल हुशारीने आधी प्रवेश परिक्षा आणि नंतरची मुलाखत काढते झालो न ह्या नौकरीचा धडा सुरू झाला. पहिल्या वर्षभरात नुसतीच हौसमौज केली. कपडे घेतले.मग एक मोटारसायकल. नातेवाईकानाही काहीबाही भेटी दिल्या. लेकरू लईच गुनाचं हाय ओ माय. काकी कौतुकानं हेल काढून बोलायची. मग बदली झाली. जालन्यातल्या राहत्या घराची डागडुजी करून आपण इथे आलो. इथे येऊन गेल्या काही वर्षांत आपला डील डौल पारच बदलून गेलायं.आई मात्र तिथेच थांबली. कधी मधी येते आपल्यासोबत राहायला. म्हणते भौ लग्न कर. मला मरण्याआधी नातवंडांची तोंडे बघू दे. आपण नुसतीच मान हालवतो. एकतर आपले नातेसंबंध साधारण त्यामुळे चांगल्या शिकलेल्या पोरी सांगून येत नाहीत. त्यात तशी गरजही नाही आणि आपल्याला बंधनात अडकायची इच्छाही नाही अजून. आलेल्या पैशावर अजून हौसमौज करायचीय अजून. एवढ्यात लग्नाची कटकट नको.सोबतच्या रुईकराचे हाल बघतोच आहे की.जरा निवांत बसला की आलाच बायकोचा फोन. पक्का घरघुशा झाला आहे. नाहीतर कसला मुजोर होता. भडवा पुर्णविरामाच्या जागी शिव्या द्यायचा. आजकाल होरे नाहिरे असं काहीसं बोलत असतो. आपण असेच होऊ याची गॅरंटी नाही पण काय सांगा ?

यंदाचा उन्हाळा खूपच तापदायक दिसतो आहे. संध्याकाळ तशी आल्हाददायक असते. दिवसभर पण नुसती काहिली. करोडोंची कंत्राटं पास करत असलो तरी आपण काम करतो ते या जुनाट सरकारी ऑफिसात. इथे एअर कंडीशनिंग नाही. डेझर्ट कूलर दिवसभर आवाज करत सुरू असतात पण जीवाची काहिली काही कमी होत नाही. झक मारली न सरकारी नौकरी धरली. नाहीतर सदाकाकाचा मोठा मुलगा. कुठल्याशा कंपनीत चांगल्या हुद्द्यावर आहे. सांगतो की दिवसरात्र भन्नाट एसी सुरू असतात. स्वतःच्या केबिनमध्ये बसून काम करतो निवांत. बरेचदा तर घरूनच काम करतो. शिवाय अधून मधून परदेशातही जातो. जिथे जाईल तिथले फोटो आपल्याला आवर्जून पाठवतो. त्याच्या भाषेत बोलायचं झालं तर जीवनाचा आनंद लुटतो. हे फोटो बिटो आपल्याला उथळपणाचे लक्षण वाटते एरवी, पण ह्या भावाचे मात्र कौतुकच वाटते. मागे पुढे परदेशातच स्थाईक होइन म्हणत असतो. बाकीचे नातेवाईक हटकतात, पण आपण त्याची नेहमीच पाठराखण करतो. मागे त्याने त्याच्या ऑफिसातले काही फोटो दाखवले. चकचकीत, निळसर काचेरी उत्तुंग इमारती. विचार आला, आपण इथे बक्कळ पैसा मिळवतो पण निव्वळ भंगारात काम करतो आहोत. इमारतीतली लिफ्ट कधीच चालू नसते. सगळ्या जिन्यांच्या भिंती लोकानी पानाच्या पिचकार्या टाकून टाकून रंगवलेल्या. शासन लवकरच बजेट काढणार आहे म्हणताहेत, या इमारतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी. कराल बाबा पण तोवर वैताग आहे. शहरातली प्रचंड गर्दी टाळत टाळत इथवर पोचेतो कंटाळायला होतं. त्यात हा जीवघेणा उकाडा. सरकारी कामांची तगतग, दिवसभर भेटायला येणारे लोक, मंत्र्यांचे दौरे आणि वैतागवाण्या इतर अनेक गोष्टी. त्यात आता कुठलातरी सरकारी महोत्सव आला आहे. साहेबाला यात भारी रस. सगळे नियोजन त्याच्याच हातात आहे. त्याच्याबरोबर आपण आणि चंद्या आहोतच. शिवाय सगळी यंत्रणा. साहेब तर साहेब, त्याचा बापही या बाबतीत भलताच रसिया. आजकाल तोही येऊन बसतो ऑफिसात. मोठमोठ्या गप्पा हाणतो. नको तिथे नाक खुपसतो. नवी पिढी तत्ववादी नाही म्हणत असतो. आम्ही कशी कामे केली पहा म्हणतो. एक पैसा घेतला नाही कुणाचा कधी न काय काय. आपण शांतपणे ऐकून घेतो, काही बोलत नाही; पण चंद्या खूपच वैतागतो. एकतर सध्या पैसा मिळत नसल्याने तो निव्वळ कावलेला असतो आजकाल. त्यात सरकारी कार्यालयांची दुनिया छोटीच; कोणी कुठल्या योजनेत किती मलिदा दाबला ह्याची नेटकी माहिती सगळ्यांकडे असते. एक दिवस साहेबाचा बाप फारच रंगवून आपल्या साधेपणाच्या गोष्टी सांगत होता. बराच वेळ त्याची लामन सुरू होती. शेवटी चंद्याकडून राहावले नाही. म्हणाला साहेब आपण आम्हास वडीलधारे. पण आपण आणि तडपल्लीवार साहेबांनी मिळून उभे तिरना धरण लुटून खाल्ले हे अक्ख्या दुनियेला माहिती आहे. साहेबाचा बाप यावर चाटच पडला. संतापून जो निघून गेला तो पुन्हा ऑफिसकडे फिरकलाच नाही. आपण चंदयाला म्हटलो, चंद्या तुझ्या जिभेला हाड नाही, पक्का अवकाळी आहेस. कधी कुणाची उतरवशील नेमच नाही. पण हे काम जबरी केलंस गड्या. म्हातारा जाम इरिटेटींग आहे. बरा कटवला त्याला. अर्थात साहेबाचा बाप नसला तरी साहेब होताच. हा महोत्सव म्हणजे घरचं कार्य असल्यासारखा लगबगीने फिरत होता पाची दिवस महोत्सवाच्या शामियान्यांमधून. परत आपला परिचय करून द्यायचा कलाकारांसोबत. हे अमुक साहेब, तमुक साहेबांचे नातू. मोठे कलाकार आहे. आपण काय कमी कलाकार आहोत का असे यावर चंद्या हळूच बोलायाचा आणि आपण जाम हसायचो. बरं या कलाकार मंडळींचा थाटही भारीच. एकदा एक उस्ताद आले ते एकदम हळदी रंगाचा तलम झब्बा घालून. तोंडात विडा रंगलेला. गळ्यात पिवळी धम्मक सोन्याची साखळी. सोबत चार पाच प्रौढ बायकांचा घोळका. आपण चंद्याला म्हटलो, साला तू नुसताच तब्ब्येतीने रसिया. असं पिवळं धमक राहाता आलं पाहिजे गड्या ! ह्यावर चंद्या नेहमीच्या स्टाईलीत बकाबका हसला. त्यात ह्या उस्ताद साहेबांनी भलं मोठं लेक्चर दिलं. संस्कृती आणि परंपरा, आपला इतिहास. मग त्यांच्या गुरूच्या गोष्टी नि ह्यांच्या गुरूभक्तीच्या. अनेकदा कानाला हात लावत होते. आपण अशावेळी फार बोलत नाही. ऐकून घेतो. कोण जाणे खरंच मोठा माणूस असावा. आपण मूर्खासारखे काही बोलून तोंडघशी पडायचो. आपला चिंतकाचा पिंड नाहीच, पण बर्‍याच गोष्टी पटत नाहीत आपल्याला. या उस्तादांबद्दल्ही असंच झालं. आपण बराच वेळ ऐकत राहिलो आणि मग काहीबाही सांगून तिथून निघते झालो. आपला साहेब एरवी समजदार, पण त्याला प्रसिद्ध लोकांसोबत मैत्री करण्याचा मोठाच सोस.आता तर त्याच्या उत्साहाला धुमारेच फुटले होते. काहीबाही बोलत होता उगाच मध्ये-मध्ये. मध्येच आपला महागडा मोबाईल दाखवत आपण किती संगीत ऐकले आहे हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता. नको तिथे वाह वाह म्हणत होता. हे उस्ताद आपल्या क्षेत्रात पोचलेले. मनातल्या मनात साहेबाला मूर्खात काढत असावेत असे त्यांच्या सूचक हास्यावरून वाटत होते. या उस्ताद लोकाना अशा उथळ पण महत्वाच्या चाहत्यांची भारीच गरज असते. कलाकार असो वा सरकारी नोकर. शेवटी प्रत्येकालाच पोट आहे. प्रत्येकाला आपापले दुकान चालवायचे आहेच. भूक ही मूलभूत गरज. त्या नंतर येते ती धनेषणा आणि कामेषणा. या नंतर येणारी सामाजिक महत्वाकांक्षा माणसाला अनेक गोष्टी करायला लावते. उथळांसोबत उथळ होणे ही त्यातलीच एक. त्या रात्री त्या विशिष्ट गराड्यात आपणही बराच वेळ उथळ होते झालो. जगराहाटीला सामील होऊन वाहते झालो. असो.
हा महोत्सव एका मोठ्या वास्तूच्या पायथ्याशी होता. मागे भला मोठा भव्य पहाड. लोक त्याला खडक्या पहाड म्हणत. आपण शामियाना सोडून बाहेर आलो. तिथून चालत चालत मागच्या मोकळ्या मैदानात. मध्यरात्रीची वेळ, शामियान्यातून येणारा वीजदिव्यांचा प्रकाश आणि वर चंद्र चांदण्यांचा सावकाश उजाळा. या उजेडात मागचा पहाड प्रचंड दिसत होता. धीरोदात्त. हजार गोष्टी गिळून घेऊन स्थितप्रज्ञासारखा उभा. आपण किती किरकोळ आहोत ह्याची जाणीव त्यावेळी प्रकर्षाने झाली. बहुतेक गोष्टी आपल्या समजण्यापलिकडच्या. निव्वळ अनुमेय, अपरिमेय. आपण उगाचच पहाडाच्या उंचीचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला न मग ओशाळलो. ह्या धीरोदात्त अपरिमेयापुढे आपण निव्वळ मोजण्याइतपतच आहोत.अशा वेळा मोठ्या कठीण असतात. माणूस उगाचच नको त्या गोष्टींबद्दल विचार करू जातो. क्षणभरात डोळ्यांपुढून काय काय फिरून जातं. आपल्या लुटुपुटूच्या लढाया. आपले जय पराजय. चुकलेली हजार गणितं, प्रेम, संभोग, नाती, गोती आणि इतर हजारो गोष्टी. आणि मग एक नीरव शांतता जिच्यात सगळं काही वितळून जातं. उजेड पडण्याचा किंवा आपले सामर्थ्य नाहीसे होण्याचा क्षण. एरवी आपण या सामर्थ्यावर गुपचूप अहंकार बाळगून असतो. माझं शरीर माझ्या ताब्यात आहे. माझी परिस्थिती माझ्या नियंत्रणात आहे. मी सावध आहे. हा अहम मोठा आणि तीव्र असतो. या अशा अनाथ वेळा मात्र सगळ्याच गोष्टींचा विलय घडवून आणतात. उरत असाव्यात त्या ढोबळमानाने फक्त डोंगरापलिकडच्या गोष्टी.आपण त्या निर्व्याज प्रहराचा अनुभव घेतला कितीतरी वेळ. तासाभराने भानावर आलो ते मोबाईलची घंटी ढणाणा वाजली म्हणून.
( क्रमशः ; संपूर्णतः काल्पनिक ; प्रुफ्रिडिंग झालेले नाही)
- अनंत ढवळे

Copyright @ Anant Dhavale

No comments:

Post a Comment