Thursday, March 30, 2017

गझल - काही नोंदी

'समकालीन गझल' मधला लेख - इथे पुन्हा देतो आहे. :
---
गझल : काही नोंदी
---
गझलेची व्याख्या काय असावी ह्याबद्दल अनेकदा चर्चा होताना दिसून येते. माझ्या मते एखाद्या साहित्यविधेची सरधोपट व्याख्या करणे शक्य नाही. तसेच ते अत्यावश्यक देखील नाही. सुरुवातीच्या काळातल्या व्याख्या बघितल्या तर स्त्रीसोबत केलेला संवाद किंवा स्त्रियांबद्द्ल बोलणे म्हणजे गझल; हरिणाच्या शोक आणि भयग्रस्त हृदयातला हुंकार म्हणजे गझल अशी काही वर्णने सापडतात. पण गेल्या साताठशे वर्षांचा गझलेचा प्रवास बघता, ह्या व्याख्यांची व्याप्ती गझलेने केंव्हाच पार केलेली आहे असे लक्षात येते. त्यामुळे ह्या व्याख्या अत्यंत मर्यादित आहेत असे म्हणावे वाटते. खरे तर गझलेला विषयांची मर्यादा नाही. मानवी जीवन आणि संवेदनांचे जग जितके विशाल आहे, तितकीच गझलेची व्याप्तीदेखील. गझलेला निव्वळ प्रेमकविता म्हणणे हे तिच्या मूलभूत वैशिष्ट्यांचा खून करण्यासारखे आहे असे आहे प्रसिद्ध उर्दू समीक्षक डॉ. इबादत बरेलवी ह्यांनी म्हटले आहे. गझलेत जसे अमूर्ताचे चिंतन आहे तसे अनेक ऐतिहासिक, सामजिक, मनोदैहिक विषयही आहेत. थोडक्यात गझलेच्या चिंतनाचे विषय हे माणसाच्या जीवनाप्रमाणेच अमर्याद आहेत.
तगज्जुल (म्हणजे भाषिक साधने) आणि तखैय्युल (म्हणजे प्रातिभिक साधने) ह्या दोन प्रमुख घटकांचा परिपाक असलेली, वृत्त-काफियादिकांचे काही विशिष्ट नियम पाळून लिहिलेली घाटनिष्ठ आणि संवादी कविता म्हणजे गझल असे ढोबळ मानाने म्हणता येईल. भाषिक साधने आणि विचार (किंवा) आशय ह्यांना मर्यादा नाहीत. जसजशी गझल लिहिली जाईल, तसतसा ह्या संज्ञांचा विकास होत जाईल. शेर हा गझलेच्या घाटाचा प्रमुख घटक. गझलेची म्हणून जी काही वैशिष्ट्ये आहेत ती शेराची देखील आहेत. गझलेतला शेर हा एक स्वतंत्र आणि संपूर्ण विचारसंकुल असतो असे फिराक गोरखपुरी म्हणतात. कवीचे वक्तव्य, त्याची अनुभुती, त्या अनुभवातली तीव्रता - उत्कटता, आवाहकत्व, भाषेचे आणि प्रतिमांचे संघटन ह्या सगळ्यांचा परिपाक होऊन एक अंतर्बाह्य एकजीव असे संकुल जेव्हा उभे राह्ते - तेंव्हा खऱ्या अर्थाने चांगला शेर उभा राहतो. आशय आणि व्यक्तीकरणामध्ये एक प्रकारची समतानता आणि संतुलन हे शेराचे प्रमुख वैशिष्ट्य. शेर संपल्यानंतर त्यातल्या अर्थ आणि जाणिवेच्या अनेक छटा वाचणाऱ्याच्या मनात उमटत राहतात. गझलेचा शेर हा शेर संपल्यानंतर खऱ्या अर्थाने सुरू होते असे बशर नवाज ह्यांनी म्हटले आहे ते यामुळेच. चांगला शेर हा बरेचदा आपल्या अपूर्वतेने किंवा ताजेपणामुळे देखील लक्षात राहतो - भाषा, शैली आणि आशयाच्या नाविन्यामुळे एरवी लक्षात न आलेली गोष्ट पुढे आणली जाते. निव्वळ विरोधाभास, धक्कातंत्र, कलाटणी अथवा चमत्कृती ही शेरांची वैशिष्ट्ये नाहीत ही गोष्ट इथे लक्षात यावी. गालिबचे शेर जनमानसात कायमचे कोरले गेले आहेत, ते त्यातल्या बौद्धिक प्रतिमा, अंगभूत पेच, अत्यंत समृद्ध शब्दकळा आणि शैलीमुळे - विरोधाभास, चंचलता किंवा हेलकाव्यामुळे नाहीत. चांगल्या शेरांचे जे अनेक गुण सांगितले जातात त्यात अनेकार्थत्व (वरकरणी जो अर्थ वाटतो आहे त्यापेक्षा वेगळा अर्थ असणे, अनेक अर्थ निघणे); शब्दौचित्य (उचित आणि अर्थाशी योग्य संबंध सिद्ध करणारे शब्द वापरणे); भाषासौकर्य (बोलण्यासारखी सहज भाषा वापरणे) इ. उल्लेखनीय आहेत.
गझल ही घाटनिष्ठ रचना आहे असे आपण जेंव्हा म्हणतो, तेंव्हा त्यात एक प्रकारचे सौष्ठव, घडाई किंवा बांधणी अपेक्षित असते. कुठल्याही पद्य कवितेत, मग ती साधी ओवी का असेना, एक विशिष्ट रचना दिसून येते - ही रचना गझलेत थोडी जास्त उठावदार असते इतकेच. गझलेच्या पारंपरिक टीकाकारांना ह्या रचनेबद्दल, तिच्यातल्या बंधनांबद्दल नेहमीच आक्षेप राहिलेला आहे. इतके क्लिष्ट नियम असलेली कविता विचाराचा अथवा आशयाचा नीट विकास होवू देणे शक्य नाही असा काहीसा हा आक्षेप असतो. गझलेत मोठ्या समजल्या जाणाऱ्या कवींच्या गझलांकडे बघितल्यास ह्या बंदिस्त घाटातूनही अत्यंत गहन आशय आणि क्लिष्ट विचार उतरून आलेली दिसून येतात. शिवाय गझलेच्या रुपात आल्याने, त्या गहन विषयांमध्येदेखील एक प्रकारची सहजता आणि संस्मरणीयता आलेली आहे हे ही लक्षात येते. मीर तकी मीर आणि गालिब ह्यांचे अनेक शेर या गोष्टीचे प्रमाण आहेत. या दोन कवींचे शेर बरेचदा आपल्या अर्थाआधी आपल्या रचनासौंदर्याने वाचणाऱ्याला आकर्षून घेतात. थोडेसे वेगळ्या शब्दांत बोलायचे झाल्यास गझलेच्या बंधनांमध्येच गझलेचे सौंदर्यदेखील दडलेले आहे. शब्दांची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी, लय, नाद, जाणिवेची तीव्रता ह्या रचनावैशिष्ट्यांमुळे गझलेतील अनुभवाची संघटना बनत, उलगडत आणि विकसित होत जाते.
साहित्याच्या प्रत्येक विधेची आपली अशी बलस्थाने असतात, तशाच मर्यादाही असतात. गझलेलाही आपल्या अंगभूत मर्यादा आहेतच - त्या नाकारण्याचे कारण नाही. मुक्त कवितेत विचार खुलवत नेण्यासाठी भरपूर जागा असते. गझलेत मात्र दोन ओळींचाच अवकाश असतो. दरवेळी कवीला आपला आशय शेरांच्या बंदिस्त घाटातून समर्थपणे पेलवेलच असे नाही. पण ह्या संक्षिप्ततेमुळे गझलेच्या शेरामधून येणारा आशय अधिक गडद, सघन होऊन येतो हे ही लक्षात घेतले पाहिजे.
आता गझलेच्या भाषिक साधनांबद्दल थोडेसे बोलू. वर म्हटल्याप्रमाणे तगज्जुल हा गझलेतला महत्वाचा घटक. ह्या संज्ञेबद्दल आपल्याकडे अनेक गैरसमज पसरलेले आहेत. तगज्जुल म्हणजे 'गझलीयत' आहे असेही सर्रास बोलले जाते. वास्तविक गझलीयत असा काही प्रकार नसतो. शेरांमध्ये चमत्कृती असावी, हेलकावा असावा, शेर गोटीबंद असावा, शेरातून काही विरोधाभासात्मक आले पाहिजे आणि हे घटक शेरात नसले, तर त्या शेरात गझलीयत नसते - असे अनेक गैरसमज मराठीत वर्षानुवर्ष पसरून राहिलेले आहेत. खरंतर विरोधाभास, चमत्कृती इ. लक्षणे मुशायऱ्यातून हमखास गाजणाऱ्या पण उर्दू साहित्यात नेहमीच गौण मानल्या गेलेल्या टाळीबाज गझलांची आहेत. थोडक्यात तगज्जुल या संज्ञेचा गझलीयत सारख्या काल्पनिक गोष्टींशी काहीएक संबंध नाही. तगज्जुल म्हणजे गझलेची भाषिक साधने - ह्यात प्रतिमा, प्रतिके, दंतकथा, वाक् प्रचार, उपमा इ.चा समावेश होतो. उर्दू गझलेपुरते पाहू गेल्यास जाम, सुराही, मैखाना, साकी, गुल, बुलबुल, लैला मजनू, शीरी फरहाद ह्यांच्या कथा इ. अनेक गोष्टींचा समावेश होतो. अर्थातच काळासोबत ही प्रतिमा प्रतिके बदलत गेलेली आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. आधुनिक उर्दू गझलेची प्रतिमासृष्टी ही चिंतनपरक आहे; शिवाय दैनंदिन जीवनातल्या अनेक गोष्टीही तिच्यात समाविष्ट झालेल्या आहेत. एकोणिसाव्या शतकात – विशेषत: तरक्कीपसंद (प्रगतीशील) कवींच्या गझलांमधून ह्या प्रतिमासृष्टीचा विशेष विस्तार झालेला दिसून येतो . डॉ शाहपार रसूल यानी म्हटल्याप्रमाणे प्रगतीशील उर्दू कवींनी आयुष्याच्या फैलावत जाणाऱ्या परिदृष्याला आपल्या अभिव्यक्तीचा पाया मानले आहे.
मराठी गझलेची ही साधने किंवा प्रतिमाविश्व सुरुवातीच्या काळात स्वाभाविकपणे मर्यादितच होते. मी विरुद्ध जग हा काल्पनिक संघर्ष आणि ह्या संघर्षांच्या अनुषंगाने येणाऱ्या प्रतिमा आणि काहीशा आग्रही - अनेकवेळा आक्रमक अशा शैलीचा बोलबोला होता. ख्ररं तर कवीने कुठल्या प्रकारे लिहावे, संयत लिहावे की आक्रमक लिहावे हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे असे म्हणता येते. पण गझलेचा, विशेषतः उर्दू गझलेचा इतिहास बघता, ह्या गझलेत मोठे किंवा महत्वाचे मानले गेलेले लेखन बघता - गझलेचा स्वर हा संयत असतो असेच म्हणावे लागेल. गझलेच्या शेरांमधली आक्रमकता क्वचितप्रसंगी आपल्या वेगळेपणामुळे आकर्षक वाटत असली तरी ती गझलेचा स्थायीभाव होऊ शकत नाही. हीच गोष्ट चमत्कृती,विरोधाभास ई. बद्दलही म्हणता येईल.
गझल आपण उर्दूकडून घेतली - त्याबद्दल आपण उर्दू भाषेचे आणि अर्थातच सुरेश भटांचे ऋणी आहोत. गेल्या चार शतकांमध्ये उर्दूत प्रचंड मोठ्या प्रमाणात गझल लिहिली गेलेली आहे. तिच्यात अनेक प्रवाह, शाखा आणि मत-मतांतरे आहेत. पैकी मराठीला दिल्ली स्कूलची उर्दू गझल - विशेषत: मीर आणि गालिब ह्यांच्या गझला जास्त जवळच्या वाटतात ही वस्तुस्थिती आहे. चक्रधर, ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथादिकांच्या अध्यात्म आणि भक्तीच्या रंगात रंगलेले मराठी मन; समाजसुधारकांच्या प्रखर सामाजिकतेत विकसित आणि विस्तारीत झालेली मराठी मनाची सामूहिक जाणीव - लखनवी वळणाच्या बनावटी आणि चंचल गझलांच्या (ज्याना उर्दूतही विशेष महत्वाचे मानले जात नाही) वाटेने जाणे कठीणच आहे. प्रत्येक भाषेचा आपला एक स्वभाव, परंपरा, इतिहास आणि कल असतो. मराठी गझल ही उर्दू गझलेची थेट प्रतिकृती असणार नाही - तशी अपेक्षा करणे देखील चुकीचे ठरेल. तिचे स्वतःचे व्यक्तित्व आणि स्वभाव असेल.
गझल ह्या विधेचा व्यापक पातळीवर विचार करू जाता मराठीत (आणि इतर भाषांमधून) जे गझल लेखन होते आहे - त्याने गझल उत्तरोत्तर समृद्ध होते आहे. मराठीतले समाजजीवन, अध्यात्म, ग्रामीण आणि नागर प्रतिमा ह्या गोष्टी मराठी भाषेची गझलेला देणच आहे. मराठी गझलेबद्दल वाढलेली उत्कंठा ही उर्दू गझलेला देखील पोषक ठरते आहे. अनेक उर्दू कवी महाराष्ट्रात ओळखले, वाचले आणि चर्चिले जातात. ही आनंद आणि समाधान देणारी गोष्ट आहे; साहित्य व्यवहाराने माणसे जवळ यावीत, भाषांमधले संवाद वाढावेत हे एका उदार आणि सहिष्णू अशा सामाजिक, साहित्यिक मानसिकतेचे द्योतक आहे.
मराठी कवितेवर वारकरी साहित्याचा प्रभाव स्पष्ट आहे. किंबहुना आधुनिक मराठीच्या निर्मितीत ह्या परंपरेचा, विशेषत: तुकारामाचा मोठाच हिस्सा आहे. तुकारामाची भाषा रोखठोक आहे म्हणून आपणही रोखठोक गझल लिहिली पाहिजे हे गृहितक मात्र मुळातच चुकीचे आहे. तुकारामाची कविता अत्यंत गहन आणि एखाद्या महासागराप्रमाणे विशाल आहे. तुकारामातले काही निवडक सामाजिक अभंग म्हणजेच तुकाराम आहे असे समजून लिहिणे अयोग्य ठरेल. मराठी साहित्य, मराठी परंपरा आत्मसात करून - गझलेच्या मूळ अक्षापासून दूर न जाता आपल्याला गझल लिहिली पाहिजे. नुसतेच वृत्त लिहिता आले आणि काफिया रदीफ समजला म्हणजे गझल समजली असे होत नाही. गझलेची लय, तिचा घाट, शेरांमधले अंतर्विरोधात्मक पेच इ. समजून घेणे आवश्यक आहे.
गझलेचा सूर संयत असतो; पाण्याचा एखादा प्रवाह संथ वाहत जावा - एकसंध गतीने, तशी गझल आपल्या विचारांसहित पुढे जात असते. कुठलीही कविता ही मानवी जाणिवांची अभिव्यक्ती असते आणि जिथे जाणीवा येतात - तिथे एक गोंधळ आणि असमतोल असतोच. मात्र हा गोंधळ देखील एका 'एकसंधत्वात' आणि एका प्रतलात गझलेतून उमटताना दिसून येतो. एकीकडे विचारांचा, जाणिवांचा हा गोंधळ, आणि दुसरीकडे गझलेची संथ लय - हा समतोल साधणं कठीण असलं, तरी अशक्य नक्कीच नाही. गझलेची ही लय समजून घेण्याची इच्छा असणाऱ्यांनी मीरच्या गझलांचा निश्चीत अभ्यास करावा असे सुचवावेसे वाटते.
गेल्या दिडेक दशकात झालेले मराठी गझल लेखन मात्र ह्या अंगाने खूपच चांगले उतरलेले आहे असे आवर्जून नमूद करावेसे वाटते. जसे जसे नवनवीन कवी गझल लिहू लागले आहेत, तसतसे गझलेचे प्रतिमाविश्वही विस्तारत जाते आहे. मराठी भाषेचा स्वभाव, तिची वळणे, दैनंदिन बोलीभाषेतले वाक्प्रचार आणि म्हणी, शब्दप्रयोग, ग्रामीण भाषेचे सौंदर्य आता गझलेत खऱ्या अर्थाने येऊ लागले आहे, बहरू लागले आहे. आंतरजालामुळे कवींना उपलब्ध झालेली विविध साधने आणि गझलेचा झालेला प्रसार हे ह्या या बदलामागचे मुख्य कारण आहे हे देखील स्पष्टपणे नमूद करू इच्छितो. मराठी गझलेची ही भाषिक साधने अशीच विकसित आणि विस्तारीत होत राहोत ही अपेक्षा आहे.
आता थोडेसे बोलूत ते 'तखय्युल' ह्या संज्ञेबद्दल. खयाल म्हणजे विचार ह्या संज्ञेपासून बनलेला हा शब्द आहे. ह्या शब्दाच्या निव्वळ शब्दकोशीय अर्थाच्या पलीकडे जाऊन कवीची प्रतिभा विचार, कल्पना, आशय असे काही व्यापक अर्थ आपण घेऊ शकतो. एकूण कवीच्या प्रतिभेतून गझलेत चित्रित होणारी जी विचारव्यूहे आहेत त्याला तखैयुल म्हणता येईल. इथे गझल लिहिणाऱ्या कवीचा खरा कस लागतो. चांगले शेर चांगले का वाटतात, ह्या मागे अनेक कारणे असली तरी त्या शेरामधून व्यक्त झालेली लिहिणाऱ्याची प्रतिभा हे एक मोठेच कारण असते. मानवी जीवनाचा परिवेश बदलत गेलेला असला तरी जीवन तेच आहे; मूलभूत विषय आणि पेच तेच आहेत. आपल्या प्रतिभेतून कवीने घेतलेला मानवी जीवनाचा शोध ही कदाचित कुठल्याही गझलेची (अथवा कवितेची) सगळ्यात मोठी उपलब्धी असते. कवीची प्रतिभा ही त्याचे वाचन, चिंतन मननातून झालेले संस्कार, त्याचे निरिक्षण, स्वतःचे आणि इतरांचे अनुभव, त्याच्या कळत नकळत तयार झालेल्या भूमिका, त्याच्या आधी अस्तित्वात असलेली कवितेची परंपरा इ. अनेक गोष्टींच्या परिपाकातून विकसित होत असते. ही प्रतिभा किंवा हा तखैय्युल, कवीची गझलेतून उतरणारी छवीदेखील असते. ही प्रातिभिक साधने आणि भाषेच्या मिश्रणातून कवीची शैली निर्माण होत असावी असे मानण्यास भरपूर वाव आहे.
गझल ही 'स्व'च्या शोधाची आत्मनिष्ठ कविता आहे, पण ह्या 'स्व' ला आपल्या परिवेशापासून, परंपरा, इतिहास आणि समाजापासून वेगळे करून पाहणे शक्य नाही. सुरुवातीच्या काळातली मराठी गझल ही आत्मनिष्ठ कमी आणि आत्मकेंद्रित जास्त होती. कालानुरूप हे चित्र बदलले; किंबहुना माझ्या पिढीतल्या गझलेने ते जाणीवपूर्वक बदलवून आणले - ते आणखी बदलणे आवश्यक आहे. सध्याच्या काळात जगणाऱ्या, विचार करणाऱ्या माणसाचे युगभान, समूहभान, त्याच्या दैनंदिन जीवनातले संघर्ष, अतिप्रगत तंत्रज्ञानामुळे झालेले भंजन, खेड्यांचे कोसळत जाणे, शहरांची बकाली, बदलत चाललेली कुटुंबव्यवस्था, दिवसेंदिवस वाढत चाललेले धार्मिक संघर्ष - आणि ह्या सर्वांच्या परिणामी मानवी जीवनात आलेले दुभंगलेपण - ह्या विषयांचा वेध घेणारी; ह्या विषयांवर गझलेच्या भाषेत बोलणारी गझल अधिकाधिक प्रकर्षाने पुढे आली पाहिजे. पण असे करताना निव्वळ ह्या विषयांचे सरधोपट बातमीवजा वर्णन करून चालणार नाही. कालानुरूप होत जाणारे बदल, सामाजिक तपशील जसेच्या तसे टिपणे हे कवितेचे काम नाही. त्यासाठी इतर अनेक गोष्टी आहेत. झपाट्याने बदलत जाणाऱ्या जगाचा मानवी मनावर काय परिणाम होतो आहे; त्याच्या अस्तित्वलक्ष्यी प्रेरणा, महत्वाकांक्षा, भीती, प्रेमभावना, वासना; समूहाशी असलेले त्याचे नाते इ. गोष्टींचा विचार गझलेला करावा लागेल.
उर्दू गझलेत अनेक शतके प्रेमाचा बोलबाला राहिलेला आहे. इतका की गझल म्हणजे एक प्रकारची प्रेमकविताच आहे असेही म्हटले जाते. हे अगदीच मर्यादित अर्थाने खरेही आहे. गझलेच्या प्रारंभिक शायरांमध्ये अनेक सूफी संत होते. ह्या संतांनी आपल्या ईश्वराला उद्देशून अनेक प्रेमकविता लिहिल्या आहेत. अमिर खुसरौचे उदाहरण ह्या अनुषंगाने लक्षात घेता येईल. खुसरौच्या गझलेतला पिया म्हणजे त्याचा ईश्वर आहे. आपल्याकडे भक्ती संप्रदाय आणि वारकरी संप्रदायातले प्रेम; किंवा तुकाराम ज्याला 'आनंद' म्हणतो तीच ही भावना आहे. पुढे मीर आणि गालिबच्या गझलांमधून हे चिंतन निव्वळ प्रेमभावनेपुरते मर्यादित न राहता एकंदर मानवी जीवन आणि आयुष्याचा ठाव घेताना दिसून येते. विशेषता: मीरच्या गझलांची भाषा ही वरकरणी बाह्य प्रेमाची असली, तरी त्याची प्रवृत्ती ही प्रेमातला 'हकीकी' म्हणजे 'सत' भाव शोधण्याकडेच असल्याची दिसून येते. एकूणच उर्दू गझलेतल्या प्रेमाला बरेचदा चिंतनाची डूब असते असे लक्षात येते.
अर्थातच उर्दू शायरांनी हे जे चिंतन केले आहे, ते प्रेमाच्या भाषेत - गझलेचे सौंदर्यभान राखत, तिचे 'कवितापण' जपत केलेले आहे हे ही लक्षात घेतले पाहिजे. गझल प्रेमाबद्दल, आयुष्याबद्दल चिंतन करते, पण ती काही थेट आध्यात्मिक कविता अथवा भक्तीगीत नसते; तसेच ती रुक्ष दर्शनशास्त्रही नसते हा तरल भेद विसरता कामा नये. थेट भक्तीपर लिहिणे किंवा तत्वचिंतनातला एखादा सिद्धांत जसाच्या तसा उचलून गझलेच्या शेरात टाकणे म्हणजे गझलेच्या मूळ अक्षापासून दूर जाण्यासारखेच आहे. गझलेतला मानवी स्पर्श हरवता नये. आपल्या चिंतनपरकतेसाठी प्रसिद्ध असलेल्या दिल्ली स्कूलमधल्या कवींना देखील मानवी भाव भावनांवर, प्रेमावर भरपूर लिहिलेले आहे - त्यांच्या अनेक गझला ह्या प्रेमातली आर्तता, प्रेयसीच्या सौंदर्याची वर्णने, विरहातली व्याकुळता इ. विषयांवर बोलताना दिसून येतात (इथे बोलणे हा गझलेच्या संवादी असण्याकडे केलेला इशारा आहे). गालिबचे अनेक शेर प्रेमभावनेतल्या अनेक बारिकसारिक खाचाखोचांबद्दल बरेचदा मानसशास्त्रीय पातळीवरून विचार करताना दिसून येतात.
ह्या सगळ्या परिवेशात जेंव्हा आपण मराठी गझलेचे चिंतन करू जातो - तेंव्हा काही गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात. त्या म्हणजे मराठी कवितेची परंपरा, मराठी जनमानसाचा एकून स्वभाव आणि तिसरा, सर्वात महत्वाचा घटक म्हणजे सध्याच्या काळात आणि साहित्यात होत असलेली प्रचंड स्थित्यंतरे. मराठी कवितेची परंपरा पाहू जाता गझल ही तुलनेने अद्यापही नवी आहे असे म्हणावे लागेल. उर्दू किंवा फारसी इतकी जुनी मराठी गझलेची परंपरा नाही. ह्याचे दोन परिणाम होतात. एक परिणाम लिहिणाऱ्यांवर होतो, तो असा की त्यांच्यापुढे संदर्भासाठी विशेष सामग्री उपलब्ध नसते. दुसरा परिणाम होतो तो तत्कालीन साहित्यिक समज आणि समीक्षेवर. तुलनेने नव्या आणि दुसऱ्या एखाद्या भाषेतील परंपरेशी जवळीक सांगणाऱ्या साहित्य विधेकडे समीक्षक आणि अभ्यासक सपशेल दुर्लक्ष करतात. मराठी गझलेसोबत सध्या हेच होते आहे. वास्तविक पहाता मराठी आणि उर्दू ह्या भाषांचा संबंध अतिशय जुना आहे. उर्दूतून मराठीत आलेल्या हजारो शब्दांची उदाहरणे देता येतील. शिवाय मराठीतून दखनी उर्दूत गेलेले शब्दही अनेक आहेत. गालिबच्या अनेक उर्दू शेरांचा प्रभाव मराठीतल्या गद्यपद्य लेखनावर दिसून येतो. असे असताना केवळ उर्दूतून आलेली आहे म्हणून गझलेकडे दुर्लक्ष करणे अयोग्य तर आहेच, पण अत्यंत कोत्या मानसिकतेचे द्योतकही आहे. गझलेवर अधूनमधून होणारी द्वेषमूलक टीकेतून ही मानसिकता वेळोवेळी दिसून येत असते. साठोत्तरी पिढीतल्या काही समीक्षकांनी सुरुवातीच्या काळात गझलेवर केलेली विखारी टीका अजूनही गझलेचे अतोनात नुकसान करते आहे. नंतरच्या समीक्षक अभ्यासकांनी ह्या टीकेचे निव्वळ अनुसरण करत गझलेला दुर्लक्षित करणे सुरूच ठेवलेले आहे. असो.
गेल्या दहा पंधरा वर्षांत लिहिली गेलेली मराठी गझल ही मराठीतली अत्यंत महत्वाची कविता आहे. ही गझल कशी आहे ? तर ती कुठल्याही 'उत्तरी' गटात न मोडणारी; शहरी, ग्रामीण, महानगरी अशा कुठल्याही बेगडी विद्यापीठीय संज्ञांमध्ये न अडकलेली; तपशील आणि माहितीच्या जोखडातून कवितेला सोडवून माणसाला आणि त्याच्या आयुष्याला आपल्या सर्जनाच्या केंद्रस्थानी ठेवणारी आहे. प्रतिभेच्या आणि चिंतनाच्या सीमांना आवाहने देणारी; भाषेला तिच्या समृद्ध वारशाचा पुनः प्रत्यय देणारी; बहुतांच्या जीवन आणि भावविश्वाचे प्रतिनिधित्व करणारी ही विधा मराठी साहित्यातले एक अत्यंत महत्वाचे आणि समृद्ध दालन आहे. मराठी कवितेच्या अभ्यासकांनी, समीक्षकांनी आणि साहित्यिकसंस्थांनी ह्या गझलेची योग्य ती दखल घेणे आणि गझल लिहिणाऱ्या कवींना यथोचित स्थान देणे अत्यंत आवश्यक आहे. साहित्य अकादेमीने प्रातिनिधिक गझल संग्रह प्रकाशित केला ही आनंदाची बाब आहे. मात्र ह्यासारखे अधिकाधिक उपक्रम यापुढेही होत राहणे गरजेचे आहे. मराठी जनमानसाने एवढ्या प्रेमाने आणि आत्मियतेने जवळ केलेली ही विधा, समीक्षकांच्या अनास्थेमुळे जर साहित्यात दुर्लक्षित राहणार असेल तर ती एक मोठी विडंबनाच ठरेल.
अनंत ढवळे
पुणे, सप्टेंबर २०१६
anantdhavale@gmail.com
-------------------
संदर्भ सूची:-
१. डॉ.इबादत बरेलवी, गज़ल और मुताला ए गज़ल, अंजुमन तरक़्क़ी उर्दू पाकिस्तान, १९५५.
२. शम्सुर्रहमान फ़ारूक़ी, मीर की कविता और भारतीय सौन्दर्यबोध (शेर-ए-शोर अंगेज का हिन्दी अनुवाद), भारतीय ज्ञानपीठ, २०१४.
 ३. अग्निएस्झ्का कुक्झ्जेविक्क्झ फ्रास, द बिल्वड अँड द लवर - लव इन क्लासिकल उर्दू गझल, क्रॅको इन्डोलॉजिकल स्टडीज, व्हॉल्युम १२, २०१०
४. फ़िराक़ गोरखपुरी, उर्दू की इश्क़िया शायरी, वाणी प्रकाशन, २०१४
५. डॉ शाहपार रसूल ‘फिक्रो तहकी़क’ ह्या मासिकाचा नयी गज़ल विशेषांक
 ६. मराठी ग़ज़ल : अर्धशतकाचा प्रवास, संपादक: राम पंडित, साहित्य अकादेमी, २०१४
७. मीर, संपादक: अनंत ढवळे, हिंडोल प्रकाशन औरंगाबाद, २००६
ॠणनिर्देश :
ज्येष्ठ उर्दू कवी आणि विचारवंत स्व. बशर नवाझ साहेब; प्रसिद्ध उर्दू कवी आणि अनुवादक श्री अस्लम मिर्झा; ज्येष्ठ अभ्यासक डॉ. राम पंडीत आणि इतर अनेक कवी, अभ्यासक मित्र

No comments:

Post a Comment