Sunday, July 9, 2017

गझल - परिवेश, परंपरा आणि अर्थवत्तेची साधने

गझल - परिवेश, परंपरा आणि अर्थवत्तेची साधने 

झलेचा भारतीय उपखंडावरील प्रभाव स्पष्ट आहे. गेल्या दोन-तीनशे वर्षांच्या काळातील गझल लेखनाचा प्रभाव इथल्या जीवनावर आणि इथल्या जीवनाचा प्रभाव गझलेवर पडला आहे.  अनेक गझल, त्या गझलांमधले शेर लोकोक्तीचा भाग बनलेले आहेत, अजूनही बनत आहेत.  लोकजीवनात गझलेचे इतक्या मोठ्या प्रमाणावर रूळण्याचे काय कारण असावे?  ह्या प्रश्नाचे उत्तर कदाचित पौर्वात्य संस्कृतीत - आणि त्याहूनही अधिक इथल्या मानसिकतेत अथवा सामूहिक जाणीवेत दडलेले असावे. भारतीय तत्वज्ञान, भक्ती परंपरा आणि सूफी संप्रदायांची उदारमतवादी प्रेम-जाणीव ह्यांचा अनोखा संगम गझलेच्या चिंतनात झालेला दिसून येतो. भारतीय उपखंडातल्या लोकजीवनाकडे बघितल्यास असे दिसून येते, की इथला समाज अनेक पातळ्यांवर तुटलेला आणि विभाजित आहे.  धर्म, जात, भाषा, प्रांतिक अभिनिवेश अशा अनेक गोष्टी सांगता येतील. पण एक मोठाच सामाजिक विरोधाभास हाही आहे, की एक उदारमतवादी विचारधारा ह्या खंडप्राय देशाच्या उंचसखल जमीनीतून शतकानुशतके वाहत आलेली आहे. हे चिंतन, ही विचारधारा वेगवेगळ्या भाषांमधून उभ्या राहिलेल्या भक्तीपरंपरा आणि संतकवींच्या माध्यमातून आलेली आहे.  भक्तीपरंपरेतली प्रेमाची, साधेपणाची शिकवण ह्या उदारमतवादी सर्वसमावेशकतेचा पाया आहे. या चिंतनाचे काहीसे 'भौतिक' रूप गझलेतून उतरून आलेले आहे. भक्तीपरंपरेत प्रेम आध्यात्मिक पातळीवरचे तर गझलेतले काहीसे अधिभौतिक - किंबहुना ह्या दोन पातळ्यांच्या मधले आहे.

कविता आणि चिंतन ह्यातला मूलभूत फरक आहे की चिंतन (किंवा तत्वज्ञान) गोष्टींची व्याख्या करण्याचा, आणि त्या व्याख्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असते - तर कविता ही गोष्टींच्या - माणसावर, त्याच्या जीवनावर होणार्‍या परिणामाचा विचार करत असते. चांगल्या कवितेत हा विचार भावनेच्या किंवा निव्वळ कल्पनेच्या पलीकडे - जाणिवेच्या पातळीवर जाताना दिसून येतो.  गझल देखील ह्या गोष्टीला अपवाद नाही.  गझल ही रोमँटीक कविता आहे का?  ह्या प्रश्नाचे उत्तर हो आणि नाही असे दोन्ही देता येते. मी मागेच म्हटल्याप्रमाणे गझलेचा सुरुवातीचा तोंड्वळा पाहिला तर तो प्रियकराच्या व्यथित आणि अति भावनिक 'उद्गारांचा' दिसून येते.  त्यामुळे हे अति भावनिक उद्गार किंवा हुंकारयुक्त 'वक्तृत्व' म्हणजेच गझल आहे असा समज अनेकांचा होऊ शकतो.  पण हे गझलेचे सर्वंकष वर्णन किंवा स्वभाव नाही.  रोमँटीक कविता क्वचितच विचाराला प्राधान्य देताना दिसून येते. ह्या कवितांचे वैशिष्ट्य म्हणजे थेट भावनिक प्रतिक्रिया - आणि भावनेच्या पातळीवर निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या कल्पना आणि प्रतिमा.  गझल अशी कविता आहे का?  तर नक्कीच नाही.  गझलेचा शेर क्वचित भावनेच्या पातळीवर जाणारा असला - तरी तो निव्वळ भावुक अभिव्यक्ती नसतो. वेदनेने विव्हळणे एक आणि त्या वेदनेचे मूळ शोधू जाणे दुसरे. मानवी जीवन अथाह आहे, माणसाचे स्वभावविश्व महासागराप्रमाणे विशाल आहे. व्यक्तीचे अनुभवविश्व आणि लौकिक जग ह्यांचा परस्पर संबंध शोधणे हा गझलेचा मूळ स्वभाव आहे; आणि तिचा गाभा चिंतनाचा आहे.  पण हे चिंतन रूक्ष तत्वज्ञानाच्या भाषेत नाही - तसेच ह्या चिंतनाचा कल गोष्टींची व्याख्या करण्याचा देखील नाही. अभिव्यक्तीमधली उत्कटता आणि मानवीयता राखूनच गझल हे चिंतन करताना दिसून येते. अपवाद प्रत्येक गोष्टीला असतात, गझलेतही आहेत.  निव्वळ भावनिक लेखन गझलेतही होतेच - पण त्यापलीकडे लिहिली जाणारी गझल बघणे ह्या दृष्टीने आवश्यक आहे. मराठी गझलेतली पहिली पिढी मात्र व्याज रोमँटिकतेच्या आहारी जाऊन बव्हंशी भावूक लेखन करती झाली हे ह्या ठिकाणी खेदाने नमूद करावेसे वाटते. ह्या पिढीने गझलेचा प्रवाह वाहता ठेवण्याचे अत्यंत महत्वाचे काम केले हे मान्यच, पण आशय आणि विचारांच्या कसोट्यांवर ह्या पिढीचे लेखन तोकडे पडताना दिसून येते. सध्या मराठी गझलेत मुशायर्‍यांचा जोर आहे. या उपक्रमांमधून नवे कवी लोकपटलावर पुढे येत असले तरी निव्वळ भावनाप्रधान आणि लोकरंजनपर लेखनाकडे कल वाढत जातो आहे हे देखील नोंदवावेसे वाटते. 
       
मी कोण आहे? माझ्याभोवतीचे अफाट, प्रचंड वेगाने पुढे जाणारे जग आणि मी - ह्यांचा परस्पर संबंध कसा आहे? या जीवनाचे मूळ कारण काय आहे?  हे जग कुणी बनवले आहे?  गोष्टी अशा आहेत तर त्या अशा का आहेत? प्रेम, वासना, अहंकार, द्वेष, हिंसा ह्या भावनांचे मानवी परस्परसंबंधांमध्ये काय स्थान आहे? मानवी जीवनातील प्रचंड मोठ्या विरोधाभासाचे मूळ कशात आहे?  असे अनेक प्रश्न आहेत. काही प्रश्न मूलभूत जगाबद्दलचे आहेत - तर काही मानवी मनोव्यापारांबद्दलचे. विचार करण्याची तयारी असलेल्या कुठल्याही माणसाला हे प्रश्न पडतच असतात. ह्या प्रश्नांचा शोध घेण्याचे काम अनेक हजार वर्षांपासून सुरूच आहे. प्रत्येक भाषेतल्या मोठ्या चिंतकांनी, कवींनी ह्या प्रश्नांना हात घातलेला आहे - गझलेतही या प्रश्नांचे, ह्या अन्वेषणाचे प्रतिबिंब अनेकविध रंगांत पडलेले दिसून येते. फारसी गझलेकडून परंपरेने चालत आलेले चिंतनाचे विषय (फिक्र), प्रतिमा- प्रतीके उर्दू गझलेने हातोहात उचलून घेतले. ह्या दृष्टीने उर्दू कवींच्या चिंतनावर फारसी अरबी कवींच्या चिंतनाचा मोठाच पगडा होता - पण त्याहूनही अधिक प्रभाव सूफी विचारधारेतल्या वहदतुल वुजुद - म्हणजे अस्तित्वातल्या एकतेच्या मताचा (ईश्वराचे प्रत्येक गोष्टीत अस्तित्वआहे - किंबहुना ईश्वर हेच एकमेव अस्तित्व) होता हे लक्षात घेतले पाहिजे. सूफींचे हे मत वेदांत आणि बौद्ध तत्वज्ञानाशी काहीसे मिळतेजुळते आहे. मी आणि माझा प्रियकर, माझा देव एकच आहोत ही ती भावना.  महायान बौद्धांचा शून्यवाद; उपनिषदांनी सांगितलेला व्यक्तीचा ब्रम्हणातला विलय; आणि भक्तीपरंपरेतल्या विविध मतांचा इस्लाममधल्या सूफी परंपरेशी हा एकप्रकारे समन्वयच आहे. नागार्जुनाचे शून्य आणि वेदांत्यांचे निर्गुण ब्रम्ह ह्या दोन्ही गोष्टी अंतिमतः मिळत्याजुळत्या आहेत. शून्यवादाला मध्यम मार्ग असे देखील म्हटले जाते. सत्य आणि असत्य अशा दोन टोकांना मान्य न करता वस्तूंच्या निर्भर अस्तित्वास शून्यवादाने मानले आहे (conditional existence) - गोष्टींचा स्वभाव इतर गोष्टींवर अवलंबून असतो. अशी कुठलीच वस्तू नाही जी अन्य वस्तूवर अवलंबून नाही. गोष्टींची परनिर्भरता आणि अवर्णनीयता म्हणजे शून्य- कुठलेच अस्तित्व नसणे म्हणजे शून्य नसून, जे काही आहे ते वर्णनातीत आहे असे शून्यवाद मानतो. शून्य म्ह़णजे काय - तर जे सत्य नाही, असत्य नाही, सत्य आणि असत्य दोन्ही नाही, किंवा सत्य आणि असत्य दोन्ही आहे असेही म्हणता येत नाही.  ह्या अफाट अवर्णनीय अस्तित्वाचे गहन दर्शन गझलेतून सतत येत गेलेले आहे.  एकूण भारतीय दर्शन अफाट आहे. या दर्शनाचा प्रभाव गझलेवर न पडता तर नवलच. वेगवेगळ्या मतांचा, विचारधारांचा समन्वय गझलेतून अनेकविध रूपांनी झाला असल्याचे दिसून येते. ह्या व्यापक अर्थाने बघू जाता गझल ही समन्वयाची कविता आहे असे म्हणावे वाटते - हा समन्वय वैचारिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर झालेला आहे. भारतातल्या विविध भाषांना गझलेने आकर्षून घ्यावे ह्यामागे हा समन्वय, जीवनाकडे बघण्याची सहिष्णू आणि उदार दृष्टी कदाचित कारणीभूत असावी; आणि बहुधा हेच कारण असावे की गझलेत इथल्या मातीचा सुगंध दडलेला - रचला - बसला आहे.

मराठी कवितेला चक्रधर, नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ अशी प्रदीर्घ परंपरा आहे.  ह्या परंपरेच्या परिवेशात आणि गझलेच्या भाषेत मराठी गझलेत चिंतन यावे ही अपेक्षा रास्त ठरेल. हे चिंतन तत्वज्ञानाप्रमाणे निव्वळ मूलभूत विश्वाचेच असेल असे नाही, तर व्यक्तीच्या अनुभवविश्वाचेही असेल. अट एवढीच, की जे लिहिलं जातंय तो केवळ वृत्तनिर्वाह नसावा - त्यात कविता हवी. मानवी मूल्यांचे, मानवी स्वभावाचे, जीवनातील विरोधाभासांचे चित्रण व्हावे.  मात्रा जुळवण्यासाठी किंवा मोजण्यासाठी कुठलीही प्रतिभा लागत नाही.  वृत्त हे गझलेचे साधन आहे, साध्य नाही, ही गोष्ट पुन्हा एकदा सांगावीशी वाटते.         
             
आता थोडेसे बोलूयात ते समकालीनतेबद्दल. समकालीन म्हणजे आताच्या काळातले, सध्याचे.  याहून अधिक संदर्भ ह्या संज्ञेला जोडण्याची गरज नाही. आताच्या काळात जगणार्‍या लेखकांचे लेखन; आणि गंमत अशी की, की हे लेखन जर मूलगामी असेल - तर ते कुठल्याही काळात समकालीनच ठरेल. मीर, गालिब आणि तुकाराम अगदी सध्याच्या काळात लिहित असल्यासारखे वाटतात. ह्याचे कारण काय असावे? ह्या कवितांचा पट इतका मोठा आहे की त्यात मानवी जीवनाचा प्रचंड आवाका सामावलेला आहे.  हा आवाका सामावून घेण्याच्या प्रयत्नात असणारे हे लेखन मानवी जाणिवेच्या मुळापर्यंत पोचते.  माणूस आणि त्याचा भवताल, त्याचे आयुष्य ह्याची सांगड घालू पहाणारे हे लेखन अनेक पातळ्यांवर फिरताना दिसते.  या स्तरांमध्ये वरवर दिसणारे भावनावेगही येतात आणि रेखीव- घडीव चौकटीच्या पली़कडे असणारे संभ्रम, विरोधाभास, भीती, द्वेष, अहंकार, वासना देखील. एकूण माणूस हा मोठ्या कवितेचा (किंबहुना कुठल्याही कलेचा) केंद्रबिंदू राहिलेला दिसून येतो: 

कद्र नहीं कुछ उस बंदे की

असे जेंव्हा मीर म्हणतो तेंव्हा त्याचा इशारा सामान्य माणसाच्या ओढाताणीकडे आणि विवंचनेकडे असतो. काळ कुठलाही असू देत, सामान्य माणूस नेहमीच हलाखीच्या परिस्थितीत जगत आलेला आहे.  कुठल्याही धर्माने अथवा राजसत्तेने सामान्य माणसाचे जीवन सुकर केलेले दिसून येत नाही. ह्या माणसाचे दु:ख, त्याचा दैनंदिन संघर्ष, त्याला कराव्या लागणार्‍या तडजोडी - आणि एकूणच त्याचे जीवन हा गझलेच्या आस्थेचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. गझलेतून उमटणारी दु:खाची छटा ही या माणसाच्या दु:खाचे बखान आहे हे लक्षात घेतले पाहिजे. एकीकडे हे 'अधिभौतिक' दु:ख आणि दुसरीकडे मानवाच्या अस्तित्वविषयक मूलभूत समस्या - एवढे प्रदीर्घ अंतर पार करणे मोठा कवीच जाणो. मीर जेंव्हा:

वर्ना मैं वही खिल्वती ए राजे निहां हूं

असे म्हणून अस्तित्वाच्या गहन प्रश्नांना सामोरे जातो तेंव्हा ह्या गोष्टीची प्रचीती येते. .
        
एकूण माणूस आणि त्याचे भावविश्व गझलेच्या संवादाचा विषय आहे.  दलित आणि ग्रामीण साहित्यात सामान्य माणसाबद्दलचा जो कळवळा, जी आस्था आणि जे प्रेम दिसून येत - ते साहचर्याने मराठी गझलेत देखील येईल अशी अपेक्षा करण्यास हरकत नसावी. पण गझलेतून निव्वळ 'तपशीलीकरणाचे' काम होऊ नये. मीर, गालिब, तुकाराम, कबीर - ह्या महाकवींनी आपल्या काळाचा निव्वळ तपशील मांडण्याचे काम केलेले नाही हे लक्षात घेतले पाहिजे. आधुनिक मराठी कविता - आणि कवितेतले काही 'राजमान्य' प्रवाह हे दुर्दैवाने तपशीलातच गुंतून पडलेले दिसून येतात. जागतिकीकरण आणि महानगरातले विखंडित आयुष्य ह्याच्या परिणामी आलेल्या प्रतिक्रियात्मक स्वरूपाच्या कविता अति-प्रासंगिक ठरून कालबाह्य होताना दिसून येताहेत. कविता नुसतीच प्रतिक्रिया असू शकत नाही. कवितेने  भावनिक प्रतिक्रियेच्या पुढे जाणे अपेक्षित आहे.   
        
कवींची इच्छा असो वा नसो - किंवा गझल लिहिणाऱ्या अनेकांना ह्या गोष्टीची जाणीव असो वा नसो; मराठी गझल ही तथाकथित प्रतिक्रियावादी कविता आणि नाटकी भावकवितेच्या मधोमध उभी आहे.  गझलेने ह्या दोनही प्रवाहांपासून काहीसे दूर राहणे आवश्यक आहे. आम्हाला पाडगावकर - गुलझार- मुनव्वर राणा वळणाची अतिभावनिक - कौटुंबिक अभिव्यक्ती नको आहे - तशीच निव्वळ स्लँगमध्ये लिहिलेली महानगरांची सपाट वर्णने देखील नको आहेत. मराठीत गझल लिहिणाऱ्यांसाठी दलित कविता, साठोत्तरी कविता आणि ग्रामीण कादंबरी हे साहित्यातले महत्वाचे संदर्भ आहेत.  मराठीच काय - ह्या साहित्यातली जीवनानुभुती खरेतर जगातल्या कुठल्याही भाषेसाठी मार्गदर्शक ठरावी इतकी प्रखर आणि अस्सल आहे. साठोत्तरी कवितेने मराठी साहित्याला कृत्रिमतेच्या जोखडातून सोडवले. साठोत्तरी प्रतिभावंतांची समृद्ध शब्दकळा, प्रखर सामाजिक / ऐतिहासिक जाणीव, अभिव्यक्तीमधला आत्यंतिक प्रामाणिकपणा गझलेत आला पाहिजे. थोडक्यात गझलेतल्या आशयाच्या बांधणीसाठी; जीवनाकडे बघण्याच्या व्यापक दृष्टीसाठी आपल्याला मराठीतील उपरोल्लिखित साहित्याकडे वळावे लागेल.
         
एकूण परंपरा आणि आधुनिकता ह्यांचा मेळ गझलेकडून अपेक्षित आहे. आधुनिकता कशातली? - तर व्यक्तीकरणातली, विचार करण्यातली, शेरांची मांडणी करण्यातली. ह्यात निश्चीत नवेपणा असू शकतो. चौकटी बाहेरचा विचार करणे; घासून पुसून सपाट झालेल्या प्रतिमा न वापरणे अशा काही गोष्टी सांगता येतील. लेखनात निव्वळ भावनिकता नको, विचारही हवा. शेरांमधून झटकेदार प्रतिक्रिया देण्यापेक्षा जाणीवेच्या मूळापर्यंत जाण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. आणखी एक गोष्ट – सध्या उर्दू मुशायऱ्यांमधून कधी नव्हे इतकी वाईट गझल पुढे येते आहे - ह्या प्रकारच्या मंचीय गझलेपासून मराठी गझलेने प्रकर्षाने दूर रहावे हे देखील इथे सुचवावेसे वाटते.

गेल्या अंकात गझलेतल्या काही महत्वाच्या अंगांची सविस्तर चर्चा केली. तीच चर्चा इथे पुन्हा करण्याचा उद्देश नाही. ह्यावेळी गझलेचे अर्थगामीत्व आणि अर्थांच्या विविध छ्टांकडे एक नजर टाकूयात.  
       
बरेचदा गझलेतला सूत्रधार आणि स्थिती संदिग्ध असल्याने (बोलणारा तो किंवा ती कोण आहे? प्रसंग काय आहे? पार्श्वभूमी काय आहे?)  अनेकार्थत्वाला भरपूर जागा असते.  शिवाय जे काही बोललं जातं ते बरेचदा सूत्रबद्ध किंवा संकेतांच्या भाषेत सांगितले गेल्याने अर्थाच्या व्यापकतेत आणखी भर पडते. गझलेतल्या ह्या रचनात्मक भागाचे उपयोजन लिहिणारा कसे करतो ह्यावर गझलेची अर्थवत्ता अवलंबून असते.  हे कदाचित वाचायला अनेकांना जड जाईल - पण माझ्या मते संज्ञाप्रवाही लेखनासाठी गझलेत खूपच वाव आहे. हे बारिक कोपरे- कापरे नव्याने लिहिणारे प्रतिभावंत कवी जोखून पाहतील अशी अपेक्षा आहे. शेराचे अर्थगामीत्व समजून घेण्यासाठी जी काही साधने आहेत , त्यामध्ये गझलेची  घडीव शैली काहीसा हातभार लावते. ही घडाई गझलेतल्या शेरांना स्वयंपूर्ण एकक बनवण्यात मदत करत असते. एखादा शेर वेगळा काढून पाहिल्यास तो कवितेसारखा किंवा हायकूसारख संपूर्ण अर्थानुभव उभा करतो - ह्या मागे त्याची शैली आणि रचना देखील आहेच. दुसरे महत्वाचे साधन म्हणजे कवीने वापरलेले सूत्र - मग ती एखादी म्हण असेल, किंवा एखादी विशिष्ट प्रतिमा.  शेरातल्या मूळ विचाराचा विस्तार करण्यात ही साधने हातभार लावतात.  शेराच्या दोन ओळींमधला परस्पर संबंध देखील अर्थनिर्णयात महत्वाचा असतो - बरेचदा पहिल्या ओळीत एखादे प्रतिपादन करून, दुसऱ्या ओळीत तिचे समर्थन किंवा अधिक विवेचन केले जाते. हा क्रम असाच पाहिजे असा कुठेही आग्रह नाही - विपरितविन्यास न्यायाने एखादा शायर ह्याच्या नेमके विरूद्ध ही करू शकतो! अनेकदा ह्या दोन ओळींमधले अंतर जास्त असल्याचे दिसून येते - ह्याचे कारण शेरातली अव्यवस्था नसून गुंता-गुंतीच्या विषयांबद्दल बोलताना काहीसा दुरान्वयाने अर्थ लावण्याचा कवीचा प्रयत्न दिसून येतो.

कल्लोळ, अर्थ आणि भावावस्था हे तीन घटक आहेत {शोरिश, मानी (म'आनी), कैफियत} - जे गझलेच्या शेराला संपूर्णत्व देतात. (कैफियत म्हणजे मूड किंवा एक भावावस्था, मराठीत हा शब्द तक्रार ह्या अर्थाने रूढ होवून बसला आहे). जुन्या उर्दू कवींनी तहदारी आणि पेचदारी अशी दोन साधने वापरलेली दिसतात. तहदारी म्हणजे आशयातली स्तर-दर-स्तर उलगडत जाणारी खोली, तर पेचदारी म्हणजे गुंतागुंत. गालिबने मानी आफरीनी (माना' असे ही म्हटले जाते) असा शब्द वापरलेला आहे.  मानी आफरीनी म्हणजे अर्थाला अधिक संपन्न करणे, अनेक आयाम देणे. गालिब मानी आफरीनीच्या कलेतला मोठाच किमयागार आहे. तो अर्थाला खुलवत नेत-नेत अर्थाचे अक्षरशः बांधकाम करताना दिसून येतो. प्रतिमा, दंतकथा, शब्दांचे विशिष्ट प्रयोग करून तो शेरांमधून अनेक ताण - अनेक पेच निर्माण करतो. नारंग म्हणतात त्याप्रमाणे गालिब वाचताना वाचक एखाद्या 'सौंदर्यशास्त्रीय घटनेतून' गेल्या सारखा अवाक होतो ते ह्या मुळेच.  विचाराची मांडणी आणि तो विचार शब्दांमध्ये लिहिताना होणारी बोलण्याची मांडणी ह्या म्हणाल तर दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पैकी दुसऱ्या भागात शेर लिहिणाऱ्याची मोठीच कसोटी असते. इथे तुम्ही अर्थाला विस्तारत नेता, वेगवेगळे आयाम देता.  हे करण्यासाठी भाषेची मोठीच जाण हवी. भाषा लिहिता वाचणे एक आणि भाषेची जाण असणे दुसरे. शब्दांचे अर्थ, त्या शब्दांना जोडले गेलेले संदर्भ, शब्दांच्या परस्पर खेळातून (Play) उभे राहणारे अर्थसंघात ह्या गोष्टी शेरांना व्यापक बनवत जातात आणि मग एखादा अर्थ निव्वळ कळवला जात नाही तर एक संपूर्ण अर्थानुभव ह्या रूपात उभा केला जातो. शेरातून निव्वळ एखादी गोष्ट 'कळवणे' म्हणजे खबरिया (बातमीवजा) लिहिणे - अशा लेखनातून अनेकार्थत्वाच्या संभावना राहात नाही, केवळ एकच एक विषय सूचित केला जातो.  ह्या उलट इंशाइया बोलणे - संकेत, आश्चर्य, प्रश्न, आवाहन अशा अनेक अंगांनी समृद्ध असते - आणि ह्या 'वक्तृत्वा'तून (rhetoric) अनेकार्थत्वताच्या शक्यता निर्माण होतात. प्रतिमा, आदिबंध, प्रतिमा अशा आणखी काही गोष्टी सांगता येतील, पण तो स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
      
अर्थ (मानी) आणि विषय (मजमून) ह्या दोन गोष्टींमधला फरक ह्या दृष्टीने लक्षात घ्यावा लागेल. गालिबने अर्थांच्या शक्यता शोधण्याच्या प्रयत्नात ज्या अनेक गोष्टी केल्या त्यापैकी एक म्हणजे अत्फ आणि इजाफतींचा वापर. इजाफत म्हणजे काय तर हाले दिल किंवा गमे-दुनिया मधला ‘ए. नाम आणि विशेषणाला जोडणारी, किंवा दोन गोष्टींमधला संबंध सांगणारी सोय. अत्फ म्हणजे 'ओ', दोन गोष्टींना जोडणारा प्रयोग. गालिबने एकानंतर एक अशा वेगवान अत्फ आणि इजाफत वापरलेल्या दिसून येतात (उदा.  कैद-ए-हयात-ओ-बंद-ए-गम). ह्या प्रयोगांमधून तो वाचकावर प्रतिमा चित्रांचा भडिमार करत जातो - आणि अर्थाची अनेक वलये बनवत जातो. इथे रब्त (म्हणजे संबंध) आणि रवानी (म्हणजे प्रवाह, क्वचित वेग) हे दोन अर्थबंध काम करताना दिसून येतात. एकूण एखादा शेर वाचताना जे अर्थ उभे राहतात - त्यामागे अनेक गोष्टी कार्यरत असतात. ह्या सगळ्यांमध्ये लिहिणाऱ्याची जाणिवपूर्वकता असेलच असे मात्र नसते. बरेचदा शब्दांचे तणाव आणि गझलेच्या जमीनीतले उतार चढाव देखील अदृष्य रूपात काम करतात. (गझलेच्या जमीनीचा मी इथे उल्लेख केला आहे आहे कारण कवितेचा आकार - आणि तिचा अर्थ ह्यामधला परस्पर संबंध महत्वाचा असतो).
  
प्रत्येक भाषेची काही वैशिष्ट्ये असतात. अत्फ आणि इजाफत हे उर्दूचे वैशिष्ट्य आहे. आपल्याला आपल्या भाषेतले प्रयोग शोधून काढावे लागतील, ज्याने अर्थसंघाताचे काम नीट पार पडेल. जुन्या मराठीत वापरातले काही भाषिक प्रयोग ह्या दृष्टीकोनातून महत्वाचे आहेत. गेल्या सात-आठ दशकांमध्ये मराठी पद्य कविता अत्यंत मागे पडलेली दिसून येते. ह्या पद्य कवितेचा विकास, तिचे भाषिक आणि आशयिक संहतीकरण गझलेच्या माध्यमातून होईल अशी अपेक्षा आहे.
        
वर बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केलेला आहे – पण ही सगळी अर्थातच साधने आहेत.  शेवटी कुठल्याही चांगल्या कवितेत अर्थांच्या शेकडो शक्यता मावलेल्या असतात- आणि म्हणूनच- लिहिणाऱ्याची मूळ भूमिका वाचणाराने काढलेल्या अर्थाशी सुसंगत असेल असे आवश्यक नसते. शब्दाकडे निव्वळ संकेत म्हणून पाहिल्या कुठल्याही पाठाची अर्थवत्ता धोक्यात येऊ शकते, पण त्याबद्दल अधिक उहापोह करण्याची इथे आवश्यकता नाही.  शेरातला वर्ण्य विषय आणि शब्दांची केलेली निवड - आणि बोलणाऱ्याचा स्वर ह्यात एक प्रकारचे संतुलन असल्यास एकसंध अर्थनिर्मिती होऊ शकते. हा समतोल भाषेचा आहे, आशयाचा आहे तसाच विचारांचा देखील आहे. गझलेतून सगळेच विषय व्यवस्थित मांडता येतील असे नाही. ह्याबाबतीत कवीकडून थोडे तारतम्य बाळगले जाणे अपेक्षित आहे.  कुठल्या विषयावर शेर लिहावे आणि कुठल्यावर कविता इतकी जागरूकता लिहिणाऱ्याकडे हवी.                         


--

अनंत ढवळे
डब्लीन, ओहायो
२०१७



संदर्भ सूची::
१. उर्दू गझल अँड इंडियन माईंड,  गोपीचंद नारंग (इंग्रजी अनुवाद: निशाद झैदी)
२. गालिब मानी आफरीनी, जदलियाती वजा, शुनीता और शेरीयात, गोपीचंद नारंग
.  शेर--शोर अंगेज (मीर की कविता और भारतीय सौन्दर्यबोध), शम्सुर्रहमान फ़ारूक़ी, भारतीय ज्ञानपीठ
. नेट्स ऑफ अवेरनेस, फ्रांसिस प्रिटश्शे, युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया प्रेस
.  तत्वमीमांसा एवं ज्ञानमीमांसा, केदारनाथ तिवारी, प्रकाशक मोतीलाल बनारसीदास, दिल्ली
६. कुल्लियात-ए–मीर, मुंशी नवल किशोर प्रेस, लखनऊ
. दीवान-ए-गालिब, ग़ालिब अकादमी, दिल्ली

No comments:

Post a Comment