Saturday, May 9, 2015

लेखन

मी बरेच दिवस झाले लिहायचे ठरवतो आहे. पण काही लिहून होत नाही. म्हणजे लांब पल्ल्याचं लिखाण. एखादी कादंबरी किंवा कथा लिहीली पाहिजे. पात्र कल्पिण्याची, ती पात्रं खुलवण्याची मजा काही वेगळी असलीच पाहिजे. उगाच नाहीत लोक वर्षंवर्षं राबून कादंब लिहीत. हे तसं अंगमेहनतीचं काम आहे. रोज दोनेक हजार शब्द लिहीले पाहिजेत, तर लेखनाचा सराव होतो असं म्ह्णतात.  लिहायला तसे विषय बरेच आहेत. दिवसभरात काय काय घडलं ते लिहा. किंवा बालपणातल्या काही आठवणी कागदावर उतरवून काढा. मागे काही अतीलघू कथा लिहून पाहिल्या. इतक्या लहान की त्यातलं कथानक सुरूच झालं नाही! त्यातले काही विषय पुन्हा एकदा बघावे म्ह्णतो. एखादी दीर्घकथा तर नक्कीच लिहून होईल! मागे एक विषय डोक्यात आला होता. चांगली भरभक्कम तीन एक पिढ्यांची कादंबरी होईल एव्हढा दीर्घ. काही पानं लिहून काढली. पुढे कंटाळा आला, किंवा काही सुचलच नाही बहुतेक. मग हा विषय मागे पडला तो कायमचाच.

गद्य लेखनासाठी सरावासोबतच निरीक्षणाची क्षमता असावी लागते. एकेका गोष्टीचं बारिक सारिक वर्णन करायचं. स्टेशन म्हटलं की त्या स्टेशनाच्या आजूबाजूचा परिसर, दुकानं, माणसांचे चेहरे, त्यांची लगबग इ. चं सविस्तर करायचं. शिवाय ह्या अनुभवांचं पाठांतरदेखील मजबूत पाहिजे ! म्हणजे एखादा अनुभव नुसता तीव्रतेने भोगणेच नव्हे - तर तेव्हढ्याच टोकदार्पणे पुन्हा उभा करण्याची क्षमता हवी. हे मोठं धीराचं, काम आहे. इथे नेटाने काम करीत राहण्याच्या वृत्तीचा कस लागतो. संवादांमधला नेटकेपणा आला पाहिजे. माणसं खरोखर बोलताहेत असं वाटायला पाहिजे. लेखक हे सगळं निर्माण करत असूनही त्याचं अस्तित्व जाणवता नये. म्हणजे गोष्टीने स्वत:ला सांगत पुढे नेले पाहिजे !

आजकाल इंग्रजीत फोनवर पटकन वाचून होतील अशा कथांची लाट आली आहे . म्हणजे फारफार तर दोनेकशे शब्दांच्या कथा. जग झपाट्यानं बदलतं आहे - ह्या अशा गोष्टी होणारचं. आपणही लिहून पहाव्यात - प्रवाहासोबत वाहण्यातही गंमत असतेच की. माणूस दिवसातले सगळॆच्या सगळॆ चोवीस तास आपलं विद्रोहीत्व जपू शकत नाही ! तर ह्या कथांमध्ये धक्कातंत्र फारचं महत्वाचं असतं. पहिल्या तीनचार ओळींमध्ये कथेचा परिवेश स्थिरस्थावर होतो. मधल्या भागात कथानक उभं केलं जातं आणि अत्यंत वेगाने शेवट्च्या दोन ओळींमधून कथेला कलाट्णी दिली जाते. एक संपूर्ण अनुभव उभा रहात असेल तर ह्या प्रकारचं लेखन करायला काहीच हरकत नसावी असं मला वाटतं.

अनंत ढवळॆ
पुणे
०९/०५/१५

No comments:

Post a Comment